साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट) नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत अत्यंत बोचरी टीका केली आहे.
…तर आधी पाय पांढऱ्याऐवजी काळा कसा होईल ते पहावं!
जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांना, “हे सर्व संजय राऊत यांच्यामुळे घडत आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, “मला याबाबत माहिती नाही. मात्र संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे माणूस आहेत. त्यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्षाची अधोगती सुरू झाली. त्यामुळे त्यांचा पाय पांढऱ्याऐवजी काळा कसा होईल, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे.”
उद्धव ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता, गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले की, “या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही. मी कालच मुंबईहून आलो असून कोणते मिशन सुरू आहे याची मला कल्पना नाही.”
’ऑपरेशन टायगर’ आणि कायदेशीर पेच
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटातील ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचा दावा केला जात आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास या स्वतंत्र गटाला मान्यता मिळू शकते, ज्यामुळे या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हा संबंधित खासदारांचा गट भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
