२४ जूनला संत मुक्ताई पालखीचे प्रस्थान ६०० किमीची पंढरपूर वारी सुरू मुक्ताई पालखीचा २८ दिवसांचा भक्तिमय प्रवास सुरू
साईमत/ मुक्ताईनगर/ प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भक्तिरसात न्हाऊ घालणाऱ्या पालखी सोहळ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाच्या मानाच्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखीचे प्रस्थान २४ जून रोजी दुपारी १ वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून होणार आहे. हा ऐतिहासिक पालखी सोहळा यंदा ३१८ व्या वर्षात प्रवेश करत आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढी वारी अंतर्गत हजारो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करणार आहेत.
६०० किलोमीटरचा भक्तिमय प्रवास
‘तापीतीर ते भीमातीर’ या संकल्पनेतून ओळखल्या जाणाऱ्या या पालखी सोहळ्यात खान्देश, विदर्भ आणि मराठवाडा या भागांना जोडणारा धार्मिक व सांस्कृतिक संगम अनुभवायला मिळतो. सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करत ही पालखी २२ जुलै रोजी पंढरपूर येथील संत मुक्ताई मठ, दत्त घाट येथे पोहोचणार आहे.
या यात्रेत जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांमधून पालखी मार्गक्रमण करणार असून सुमारे दोन हजार वारकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.
प्रस्थानापूर्वी आकर्षक रथ सजावट
पालखी प्रस्थानापूर्वी संत मुक्ताई यांच्या रथाची सुगंधी फुलांनी नयनरम्य सजावट केली जाते. या रथात माऊलींच्या चांदीच्या पादुका विराजमान केल्या जातात, जे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असते. प्रस्थानानंतर अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरील मुक्ताईनगर येथील नवीन मंदिरात पहिला मुक्काम राहणार आहे.
पालखीचा विस्तृत मार्ग आणि मुक्काम
या २८ दिवसांच्या पायी प्रवासात पालखी पुढील मार्गाने मार्गक्रमण करणार आहे—
दसरखेड ➝ मलकापूर ➝ मोताळा ➝ बुलढाणा ➝ जळगाव ➝ चिखली ➝ भरोसा फाटा ➝ देऊळगाव मही ➝ देऊळगाव राजा ➝ जालना (कन्हैया नगर) ➝ काजळा फाटा ➝ अंबड ➝ वडीगोद्री ➝ गेवराई ➝ पाडळशिंगी ➝ नामलगाव फाटा ➝ बीड माळीवेस ➝ बीड बालाजी मंदिर ➝ पाली ➝ पारगाव ➝ वाकवड ➝ भूम ➝ जवळा ➝ शेंद्री ➝ माढा ➝ आष्टी ➝ आणि अखेर पंढरपूर.
निवास, भोजन व सुरक्षा व्यवस्था
पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांसाठी प्रत्येक मुक्कामस्थळी स्थानिक ग्रामस्थ आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. सकाळचा नाश्ता, चहा आणि दुपारचे भोजनही मार्गावरील गावांमध्ये उपलब्ध करून दिले जाते.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त, आरोग्य पथक, रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याचे टँकर तसेच फिरते स्वच्छतागृह यांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.या भक्तिमय सोहळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा वारकरी परंपरेच्या श्रद्धा, संस्कृती आणि एकतेच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.
