रात्रीची घटना, सकाळी उघडकीस कार मालकाला धक्का बंद कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांना मोकळे रान? नशिराबादमध्ये नागरिक संतप्त
साईमत/नशिराबाद/ प्रतिनिधी
नशिराबाद शहरात जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका कारची अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री दगड मारून तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि बंद पडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
घटनेनुसार, रामचंद्र दिगंबर देशपांडे यांची मारुती सुझुकी ऑल्टो कार जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी होती. सकाळी ते वाहनाजवळ गेले असता कारची मागील काच पूर्णपणे फुटलेली दिसून आली. परिसरात काचेचे तुकडे विखुरलेले आढळल्याने अज्ञात व्यक्तींनी दगड मारून वाहनाची जाणूनबुजून तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, घटनास्थळी आणखी एक चारचाकी वाहन उभे असतानाही केवळ याच वाहनाला लक्ष्य करण्यात आल्याने या प्रकरणामागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी वाहनमालक रामचंद्र देशपांडे यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नगरपरिषदेकडून लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नियमित देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे अनेक कॅमेरे निकामी झाले असून काही ठिकाणी केबल तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही कॅमेरे खांबांवर लटकत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असती तर आरोपींचा शोध घेणे अधिक सोपे झाले असते, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत पुरावे मिळविण्यात पोलिसांनाही अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील लहान शहरांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा दुरुस्त करून प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
