साईमत -पाचोरा – प्रतिनिधी |
शहरातील जारगाव चौफुली जवळील सारोळा रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा डाव पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. पोलिसांची गाडी येताना दिसताच चोरट्यांनी रोकड असलेले मुख्य कॅबिनेट जागेवरच टाकून कारमधून पळ काढला. पोलिसांनी धुळे जिल्ह्यापर्यंत या चोरट्यांचा थरारक पाठलाग केला, मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या कारवाईमुळे एटीएममधील ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड पूर्णपणे सुरक्षित राहिली आहे.
आज पहाटे पावणेचार वाजेच्या (३:४५) सुमारास तीन अज्ञात तरुण काळ्या रंगाच्या क्रेटा कारमधून (क्र. MH 49 CS 7028) सारोळा रस्त्यावरील एसबीआयच्या एटीएम केंद्रावर आले. त्यांनी सोबत आणलेल्या गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीनचे बाहेरील कॅबिनेट कापले. पैशांनी भरलेले मुख्य कॅबिनेट काढून ते कारमध्ये टाकण्याच्या तयारीत चोरटे होते.
पाचोरा पोलिसांचा ‘ऑन द स्पॉट’ थरारक पाठलाग
या घटनेची कुणकुण लागताच पाचोरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी शासकीय वाहनाने तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांचे वाहन येताना पाहून चोरट्यांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी पैशांचे कॅबिनेट तिथेच टाकले आणि कारमध्ये बसून तारखेड्याच्या दिशेने सुसाट वेगाने पळ काढला.
पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न लावता चोरट्यांच्या कारचा पाठलाग सुरू केला. पाचोरा ते थेट धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत हा ‘सिनेस्टाईल’ पाठलाग सुरू होता. मात्र, चोरट्यांच्या कारचा वेग अधिक असल्याने ते पुढे निघून जाण्यात यशस्वी ठरले.
बँक प्रशासनाचा सुस्त कारभार; सकाळी उशिरापर्यंत कर्मचारी बेपत्ता
पोलिसांच्या तत्परतेमुळे बँकेचे लाखो रुपये चोरीला जाण्यापासून वाचले असले, तरी एसबीआय बँक प्रशासनाचा कमालीचा हलगर्जीपणा या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. इतकी मोठी घटना घडून आणि एटीएम उघड्यावर पडलेले असतानाही, बँकेचे तंत्रज्ञ किंवा जबाबदार कर्मचारी सकाळी उशिरापर्यंत घटनास्थळी फिरकलेही नव्हते. या हलगर्जीपणामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
चोरटे धुळे मार्ग किंवा पुढे मध्य प्रदेशच्या (MP) दिशेने पळून गेल्याची शक्यता गृहीत धरून पाचोरा पोलिसांनी सर्व टोल नाके, धुळे नियंत्रण कक्ष आणि मध्य प्रदेश पोलिसांना तात्काळ अलर्ट जारी केला आहे. चोरट्यांच्या गाडीचा क्रमांक स्पष्ट मिळाल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत पाचोरा पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आली नव्हती.
