निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकतेवर भर; कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या प्रशिक्षण सत्रात मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, कार्यपद्धती आणि आवश्यक दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यावर विशेष भर देण्यात आला.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणात मतमोजणीदरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करून निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष ठेवण्यासाठी आवश्यक सूचनाही देण्यात आल्या.
या प्रशिक्षणाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी बबन काकडे, मास्टर ट्रेनर्स तसेच मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त राजपत्रित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
