आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सर्व विभागांना तत्पर राहण्याच्या सूचना; नालेसफाई, धोकादायक झाडे व इमारतींचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
बैठकीत अग्निशमन दल, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग तसेच चारही प्रभाग समित्यांच्या अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि तत्काळ कार्यवाही करावी, असे महापौरांनी स्पष्ट केले.
शहरातील नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करून त्याचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पावसाळ्यात झाडे पडण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक आणि जीर्ण झाडांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती झाडे तातडीने तोडावीत, तर रस्त्यांवर झुकलेल्या धोकादायक फांद्या हटवाव्यात, असेही सांगण्यात आले. यासोबतच शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले.
नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करताना घराच्या किंवा कंपाउंडच्या आत असलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पावसाळ्यात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देशही देण्यात आले.
या बैठकीस शहर अभियंता योगेश बोरोले, समीर बोरोले, अश्वजीत घरडे, संदीप मोरे, संजय ठाकूर, घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
