साईमत न्यूज नेटवर्क –
पंढरपूर : पंढरपूर शहरात एका रिक्षाचालकाच्या अत्यंत क्रूर हत्येची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रेल्वे रुळांवर टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित मधुकर कोरे (वय अंदाजे) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. रोहित हा पंढरपूर शहरात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत होता. काही व्यक्तींशी झालेल्या किरकोळ वादानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे.
दरम्यान, पंढरपूर येथील रेल्वे रुळांवर एका तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला रेल्वे पोलिसांनी हा मृतदेह बेवारस असल्याचे मानून पंचनामा केला. मात्र, तपासादरम्यान रोहितच्या घराजवळ त्याच्या पायाचा तुकडा आढळून आल्याने धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतर रेल्वे रुळांवर सापडलेला मृतदेह रोहित कोरे याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेनंतर पंढरपूर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. हत्येनंतर मृतदेह रेल्वे रुळांवर टाकून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न झाला का, याचाही तपास सुरू आहे. तसेच वादात सहभागी असलेल्या संशयितांची चौकशी करण्यात येत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या अमानुष हत्याकांडामुळे पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
