’डायल ११२’ आणि ‘१०९८’चे धडे; सोयगाव पोलिसांकडून चिमुरड्यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
जिल्हाभरात शाळांचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. नवीन वर्ग, नवीन पुस्तके आणि नव्या मित्रांच्या कुतूहलाने चिमुरड्यांची पावले शाळेकडे पडत असतानाच, सोयगाव तालुक्यातील शाळांच्या आवारात आज एक अत्यंत भावनिक आणि आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. एरवी खाकी वर्दीला पाहून दुरूनच पळ काढणारी लहान मुले आज त्याच खाकी वर्दीतील पोलिसांशी हसत-खेळत गप्पा मारताना दिसत होती. निमित्त होते, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातर्फे राबवण्यात आलेल्या ‘पोलीस काका व पोलीस दिदी’ या अभिनव उपक्रमाचे!
सलोखा आणि संवादाचा ‘शाळा प्रवेशोत्सव- २६’
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात ‘शाळा प्रवेशोत्सव- २६’चे औचित्य साधून हा उपक्रम राबवला जात आहे. सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तालुक्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. पोलीस काका आणि पोलीस दिदीच्या भूमिकेत अवतरलेल्या खाकीने विद्यार्थ्यांचे अत्यंत दिमाखात स्वागत केले. सपोनि दिनकर गोरे यांनी स्वतः विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शालेय जीवनाच्या नव्या वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतींचे कौतुक करत पोलिसांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
या उपक्रमात केवळ स्वागतच झाले नाही, तर पोलिसांनी मुलांच्या मनातील पोलिसांबद्दलची भीती पूर्णपणे काढून टाकली. “पोलीस हे केवळ गुन्हेगारांसाठी कडक असतात, पण चांगल्या मुलांचे ते ‘बेस्ट फ्रेंड’ असतात,” असा विश्वास पोलिसांनी मुलांमध्ये निर्माण केला.
