१९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष पेन्शन व पी.एफ. कार्यशाळा; समस्यांचे थेट निराकरण होणार
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून, १९ जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे.
या कार्यशाळेत महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-१, मुंबई येथील चार अधिकारी उपस्थित राहून निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी समजून घेणार आहेत. पेन्शन, पी.एफ., तसेच इतर संबंधित सेवा व प्रक्रियेमधील तांत्रिक अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन करून जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सेवांचा लाभ वेळेत व सुलभपणे मिळावा तसेच प्रशासनाशी थेट संवाद साधता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अनेक प्रलंबित प्रकरणे या कार्यशाळेमुळे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, तसेच या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय, आपल्या परिचयातील इतर पेन्शनधारकांनाही या कार्यशाळेबाबत माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनीही निवृत्तीवेतनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
