मॉर्निंग वॉकदरम्यान ७५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास दुचाकीवरील चोरटे भुसावळ दिशेने पसार
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील आयोध्या नगर परिसरात रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या ७५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोध्या नगरातील रहिवासी मंगला शांताराम चौधरी (वय ७५) या रविवारी सकाळी साधारण ६ वाजता नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्या आयोध्या किराणा समोरील गल्लीतून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना अडवले.
दुचाकी चालवत असलेल्या तरुणाने “तृप्ती कॉर्नर कुठे आहे?” अशी विचारणा केली. वृद्धेने रस्ता दाखवण्यासाठी हात केल्यानंतर मागे बसलेल्या दुसऱ्या तरुणाने अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जोरदार झडप घालून हिसकावून घेतले. काही क्षणांतच दोघेही दुचाकीवरून भरधाव वेगाने भुसावळ महामार्गाच्या दिशेने पसार झाले.
या घटनेत सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे सांगण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वृद्ध महिला भयभीत झाल्या असून परिसरातील नागरिकांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर मंगला चौधरी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात आरोपींपैकी एकाची ओळख सादिक शेख उर्फ शेख इराणी (वय २३, रा. पापानगर, रजा टॉवरजवळ, भुसावळ) अशी पटली असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे सकाळच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या हालचालींचा माग काढला जात आहे.
