ढोल-ताशे, फुगे आणि चॉकलेट; विद्यार्थ्यांच्या स्वागताने शाळा दुमदुमल्या
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
दोन महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर अखेर सोमवारपासून (१५ जून) राज्यभर नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला उत्साहात प्रारंभ झाला. जळगाव जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची लगबग, पालकांचा उत्साह आणि शिक्षकांचे स्वागतपर वातावरण पाहायला मिळाले. शाळांच्या घंटा पुन्हा एकदा खणखणल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक परिसर चैतन्यमय झाला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील अनेक शाळांनी विशेष तयारी केली होती. शाळांच्या प्रवेशद्वारांवर आकर्षक सडे-रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुगे, फुलांची सजावट, रंगीत कमानी आणि स्वागत फलकांनी शाळांचे परिसर सजविण्यात आले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत
पहिल्यांदाच शाळेत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे विशेष स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड केले. नवीन पुस्तके, नवीन दप्तर आणि मित्रमैत्रिणींच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. दीर्घ सुट्टीनंतर पुन्हा एकदा वर्गात बसण्याचा आणि शाळेच्या वातावरणात रमण्याचा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला.
अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनाविषयी आत्मीयता निर्माण व्हावी आणि शाळेची गोड आठवण मनात राहावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छाही दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त
दरम्यान, शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलिस दलही सतर्क झाले आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत बसस्थानके, रिक्षा थांबे, मुख्य चौक आणि शाळांच्या परिसरात पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलिस काका’ आणि ‘पोलिस दीदी’ यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते विविध शाळांच्या परिसरात गस्त घालत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध व्हावे तसेच टवाळखोरांवर नियंत्रण राहावे, यासाठी पोलिस प्रशासनाने पहिल्याच दिवसापासून कडक पावले उचलली आहेत.
शिक्षणाच्या नव्या पर्वाला उत्साहाची सुरुवात
शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्वागताच्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरला असून, नव्या शैक्षणिक पर्वाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली आहे.
