साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जळगाव विमानतळावरून गेल्या एका वर्षात तब्बल १ लाख ४३ हजार ९९२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. वाढती प्रवासी संख्या आणि जळगावचे वाढते महत्त्व लक्षात घेता, विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २५ कोटी रुपयांची विशेष योजना मंजूर करण्यात आली असून, यासाठीची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे साजऱ्या होत असलेल्या ‘प्रवासी सुविधा दिना’च्या पार्श्वभूमीवर विमानतळाचे संचालक हर्ष कुमार त्रिपाठी यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
एका वर्षात १.४३ लाख प्रवाशांची सफर
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात जळगाव विमानतळावरून ७२,००६ प्रवाशांचे आगमन झाले, तर ७१,९८६ प्रवाशांनी येथून प्रस्थान केले. सध्या विमानतळावर २९ कायमस्वरूपी आणि ३५ कंत्राटी कर्मचारी सेवा देत आहेत. ‘फ्लाय ९१’ आणि ‘अलायन्स एअर’ या कंपन्यांच्या माध्यमातून जळगाव आता थेट पुणे, मुंबई, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे. यामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला मोठी गती मिळाली आहे. तसेच, आगामी काळात दिल्लीशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
धावपट्टी ३ किलोमीटरपर्यंत वाढणार; २४ तास सुरक्षा
प्रवासी वाढल्याने आता विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा केली जात आहे.
टर्मिनल क्षमता वाढणार: सध्याच्या टर्मिनलची क्षमता १२० प्रवाशांची असून, ती ३०० प्रवाशांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटींच्या टर्मिनल आणि एप्रन विस्तार योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
धावपट्टीचा विस्तार: सध्या १.७ किलोमीटर लांबीची असलेली धावपट्टी मास्टर प्लॅननुसार ३ किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
२०२८ पर्यंत मान्यता: सुरक्षेच्या दृष्टीने डीजीसीएकडून (DGCA) जळगाव विमानतळाला २०२८ पर्यंत परवानाधारक विमानतळ म्हणून मान्यता मिळाली आहे.
जळगाव विमानतळावर सध्या दोन खासगी संस्थांच्या माध्यमातून वैमानिक प्रशिक्षण केंद्र (Flying Training Organization) चालवले जात असून, सुमारे १०० प्रशिक्षणार्थी वैमानिक येथे प्रशिक्षण घेत आहेत. हवाई वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्यासाठी ३० लाख रुपये खर्च करून नवीन ‘अति उच्च वारंवारता संप्रेषण प्रणाली’ (VHF Communication) बसवण्यात आली आहे. याशिवाय, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विमानतळ परिसरात २२८ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, यामुळे विमानतळ ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे.
आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळाचे महत्त्व अत्यंत वाढणार आहे. याशिवाय जागतिक कीर्तीची अजिंठा लेणी, अमळनेरचे मंगळग्रह मंदिर आणि शेगाव या धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी जळगाव विमानतळ हा देशातील पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा आणि सोयीचा दुवा ठरत आहे.
