मुंबई:
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ७ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना आता थेट ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीच अधिकृत दुजोरा दिला आहे. शिंदे गटाकडून सुरू असलेल्या या *’ऑपरेशन टायगर’*मुळे (Operation Tiger) ठाकरे गटात मोठी अस्वस्थता पसरली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने सर्व खासदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत.
अंबादास दानवेंची खळबळजनक कबुली
मराठवाडा दौऱ्यावर असताना अंबादास दानवे यांनी या विषयावर उघड भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. दानवे म्हणाले,
”काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, तर काही जण आता उघड उघड बोलत आहेत. आम्हाला या सर्व गोष्टी ठाऊक आहेत. लोकसभा निवडणुकीपासून दर महिना-दोन महिन्यांनी ही चर्चा होते. आता हे अधिकृतपणे मान्य करायलाच हवं.”
दानवेंच्या या धक्कादायक विधानामुळे शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ला एकप्रकारे अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
ही महाराष्ट्रातील विकृती; संजय राऊतांचा घणाघात
अंबादास दानवेंच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. राऊत म्हणाले,
”ही महाराष्ट्रातील विकृती आहे आणि या विकृतीने आता कळस गाठला आहे. यांनी पूर्ण महाराष्ट्र नासवला आहे. पण योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता या विरोधात बंड पुकारेल.”
तसेच, “जे आमचे खासदार फोडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ची भाषा करत आहेत, त्यांचे स्वतःचे अमित शाह यांनी कितीवेळा ऑपरेशन केले आहे?” असा बोचरा टोलाही राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; ‘मातोश्री’वर खलबतं
या संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी १४ जून रोजी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना खासदारांची अत्यंत महत्त्वाची आणि आणीबाणीची बैठक बोलावली आहे. दिल्लीतील सर्व खासदारांना तातडीने मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आपल्या खासदारांना नेमका कोणता कानमंत्र देतात आणि संभाव्य डॅमेज कंट्रोल कसं करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, परभणीचे खासदार संजय जाधव हे गेल्या काही बैठकांना गैरहजर राहिल्यामुळे, ते उद्याच्या बैठकीला हजर राहणार का? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
