जावयावर तीक्ष्ण हत्याराने वार, महिलांना मारहाण; बंदुकीची धमकी देत कुटुंबात दहशत
साईमत /जामनेर / प्रतिनिधी
तालुक्यातील खादगाव येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेचे तिच्याच माहेरच्या लोकांनी ‘स्कॉर्पिओ’ वाहनातून अपहरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, सोडवासोडव करणाऱ्या जावयावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तसेच कुटुंबातील महिलांना मारहाण करून बंदुकीने ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह चार जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खादगाव येथील रहिवासी शुभम ज्ञानेश्वर सोनवणे (वय २९, व्यवसाय – मजुरी) यांचा विवाह पायल यांच्याशी झाला आहे. दि. ११ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता शुभम हे घरी असताना त्यांच्या पत्नी पायल हिचे माहेरचे लोक अचानक तेथे दाखल झाले. जुन्या वादातून वाद वाढत गेल्यानंतर त्यांनी शुभम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पत्नी पायल हिलाही बेदम मारहाण करण्यात आली.
या घटनेदरम्यान संशयितांनी पायल हिचे हात-पाय धरून तिला जबरदस्तीने घराबाहेर ओढले. पती शुभम यांनी पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, सासरे ओमप्रकाश पटेल यांनी हातातील तीक्ष्ण हत्याराने शुभम यांच्या उजव्या हातावर सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी पायल हिला स्कॉर्पिओ वाहनात कोंबून तिचे अपहरण करून घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेच्या वेळी शुभम यांची बहीण शितल प्रविण चव्हाण आणि आई सुरेखा सोनवणे या दोघी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. तसेच “तुम्हाला बंदुकीने ठार मारू” अशी थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या झटापटीत बहिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून फेकण्यात आले.
दरम्यान, गोंधळात शुभम यांचा ‘रेडमी नोट १० प्रो’ मोबाईल हिसकावून घेत आरोपी भुसावळच्या दिशेने फरार झाले, असेही फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर जखमी शुभम सोनवणे यांनी ११ जून रोजी सायंकाळी ४.५७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ओमप्रकाश धनराज पटेल (सासरे), फिर्यादीचे मामासासरे (नाव अज्ञात), सुरज ओमप्रकाश पटेल आणि सुरेश पटेल (सर्व रा. वाणी, जि. यवतमाळ) या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १३८ (अपहरण), ११८(१) (घातक शस्त्राने दुखापत), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील जोशी करीत आहेत. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
