साईमत न्यूज नेटवर्क –
नवी दिल्लीतील दक्षिण-पूर्व भागातील तुघलकाबाद एक्स्टेंशन परिसरात आज पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा गुदमरून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार, इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच ठिकाणी चार्जिंगला ठेवलेली ई-स्कूटर असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुमारे २.२४ वाजता घडली. तुघलकाबाद एक्स्टेंशनमधील पाच मजली इमारतीला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले.
या दुर्घटनेत २८ वर्षीय पंकज, त्याची आई गुड्डी आणि बहीण सोनी यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील आजी आणि दुसरी बहीण मोनी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, तळमजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणांतच भडका घेतला. तेथे चार्जिंगला ठेवलेल्या ई-स्कूटरमुळे आग अधिकच पसरली आणि सात दुचाकींना ज्वाळांनी वेढले. वाहनांच्या इंधन टाक्या फुटल्याने आणि प्लास्टिक जळल्यामुळे संपूर्ण इमारतीत घनदाट, विषारी धूर पसरला. त्यामुळे वरच्या मजल्यावरील रहिवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळू शकली नाही.
अग्निशमन दलाने मोठ्या शर्थीने धुरात अडकलेल्या आठ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांना मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून शॉर्ट सर्किट आणि ई-स्कूटर चार्जिंगमुळे आग अधिक भडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र आगीचे नेमके कारण फॉरेन्सिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे. पुढील तपास सुरू आहे.
