गिरणा नदीत २००० क्युसेक्सने पाणी सोडणार; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
गिरणा मोठा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी वापरासाठी पाचवे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १३ जुन २०२६ रोजी सकाळी ६ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील गावांतील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) धुळे अंतर्गत चाळीसगाव एमआयडीसी, भडगाव नगरपरिषद आणि पाचोरा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी गिरणा नदीपात्रात हे पाणी सोडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जळगाव आणि गिरणा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार हे आवर्तन राबवले जात आहे.
गिरणा धरणातून २००० क्युसेक्स (५६.६० क्युबिक मीटर प्रति सेकंद) या क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. हे आवर्तन पूर्णतः बिगर सिंचन वापरासाठी असून, नदीपात्रातील पाणी शेतीसाठी वापरू नये तसेच नदीकाठावर पाणी उपसा करणारे शेतपंप तात्काळ बंद ठेवावेत, असे स्पष्ट निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत.
पाणी सोडण्यात येत असल्याने नदीच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, तसेच नदीपात्रात जाणे टाळावे आणि जनावरे नदीकाठावर सोडू नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा शहरांच्या पाणीपुरवठ्यासाठी हे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून, शहरांच्या बिगर सिंचन पाणी गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, पाटबंधारे विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. नदीप्रवाहातील वाढ लक्षात घेऊन सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
