पदभार स्वीकारताच आदित्य जीवने यांनी घेतला विकासकामांचा आढावा
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून युवा आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. निवर्तमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
जळगाव शहराच्या वाढत्या नागरी विस्तारासह विविध विकासकामांची जबाबदारी आता नव्या आयुक्तांच्या खांद्यावर आली आहे. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त आदित्य जीवने यांनी महापालिकेच्या प्रमुख विभागांचा प्राथमिक आढावा घेतला. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, रस्त्यांची कामे मार्गी लावणे, अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवणे तसेच प्रलंबित विकास प्रकल्पांना गती देणे यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे समजते.
महापालिकेच्या प्रशासनात कार्यक्षमता वाढविणे आणि नागरिकाभिमुख सेवा अधिक परिणामकारकपणे उपलब्ध करून देण्यासाठी नव्या आयुक्तांकडून विविध उपक्रम राबविले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, शहरातील अनेक विकास प्रकल्प अद्याप अपूर्ण असून नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे नव्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रशासन कितपत गतिमान होते, रखडलेल्या कामांना किती वेग मिळतो आणि जळगावच्या विकासाला नवी दिशा मिळते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
