दोन तासांत पोलिसांचा दणका; लूट करणारे चार जेरबंद
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
चाकूचा धाक दाखवत एका युवकाला मारहाण करून रोख रक्कम व दुचाकी लुटणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम तसेच फिर्यादीच्या मालकीची दुचाकी जप्त केली असून या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास चेतन प्रकाश पाटील (रा. खोटेनगर, जळगाव) हे आपल्या साथीदारांसह पाळधी रोडने प्रवास करत होते. यावेळी साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर चार जणांनी त्यांना अडवले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत चेतन पाटील यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच दुचाकी हिसकावून घेत घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली.
गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. परिणामी, अवघ्या दोन तासांच्या आत चारही आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये चेतन उर्फ बट्या रमेश मुशीर, उमाकांत दत्तात्रय जाधव, गौरव संजय जाधव आणि रोशन भगवान पाटील यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
अटक केलेल्या आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम आणि फिर्यादीची दुचाकी जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गुन्हा घडल्यानंतर अत्यंत कमी वेळेत आरोपींचा माग काढून त्यांना अटक करण्यात आल्याने जळगाव तालुका पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोलीस हवालदार योगेश पाटील, अविनाश देवरे, कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळी, दीपक देवरे, किरण पाटील तसेच वाहन चालक पंकज देशमुख यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.
