महायुतीतील मतभेद मिटले; जळगावात बंडखोरीवर पडदा पडणार
साईमत /जळगाव/प्रतिनिधी
जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (शिंदे गट) समर्थित बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या उमेदवारी माघारीबाबत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील पेचप्रसंग सोडवल्यानंतर आता जळगावचाही तिढा सुटल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा शनिवारी मंत्री गुलाबराव पाटील करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जळगावमधील राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, रेश्मा काळे यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून या प्रश्नावर सकारात्मक मार्ग निघाला आहे. “आता कोणतीही अडचण उरलेली नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटील मुंबईत असल्याने ते बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून ते शनिवारी जळगावात येऊन रेश्मा काळे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधतील आणि त्यानंतर अधिकृत घोषणा करतील,” असे महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनीही बैठकीतील चर्चेला सकारात्मक स्वरूप असल्याचे सांगितले. “महायुतीच्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली आहे. गुलाबराव पाटील मुंबईत असल्यामुळे निर्णयाची घोषणा आज करता आली नाही. सध्या तांत्रिकदृष्ट्या तिढा कायम असल्याचे चित्र दिसत असले, तरी उद्या होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय जाहीर होईल,” असे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून रेश्मा काळे यांच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. दिवसभर त्या संपर्काबाहेर असल्याच्या चर्चांमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीमुळे महायुतीतील मतभेद दूर करण्यास यश मिळाल्याचे संकेत मिळत आहेत.
जळगावमधील ही घडामोड महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात असून, बंडखोरीचे संकट टळल्यास निवडणुकीतील समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्या घोषणेकडे लागले असून, त्यानंतर जळगावच्या राजकीय नाट्यावर अधिकृत पडदा पडण्याची शक्यता आहे.
