रेश्मा काळेंचा बंड अद्याप कायम; जळगावात ‘महायुती’चे टेन्शन वाढले!
साईमत /प्रतिनिधी/ जळगाव : नाशिकमध्ये बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले असले, तरी जळगावात मात्र बंडखोरीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला असून, त्या अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. “गोकुळ गीतेंना विचार करायला चार दिवस मिळाले, मला चार तास तरी द्या,” असा थेट सवाल करत त्यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.
रेश्मा काळे यांच्या या पवित्र्यामुळे जळगाव महायुतीमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
’कार्यकर्त्यांची इच्छा, मी प्रचारात व्यस्त’
नाशिकमधील घडामोडींनंतर प्रसारमाध्यमांनी रेश्मा काळे यांना त्यांच्या भूमिकेविषयी विचारले असता, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
”मी सध्या माझ्या मतदारसंघात आणि प्रचारात पूर्णपणे व्यस्त आहे. मी ही निवडणूक लढवावी, अशी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची तीव्र आणि आग्रही इच्छा आहे. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे,” असे काळे यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठांवर साधला निशाणा
नेत्यांकडून होत असलेल्या दबावावर बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंचे बंड शमवण्यासाठी नेत्यांनी चार दिवस चर्चा केली, मग आपल्यालाच विचार करण्यासाठी वेळ का दिला जात नाही, असा सूर त्यांनी आळवला. “मला विचार करायला चार तास देखील दिले जात नाहीत,” असा थेट आरोप त्यांनी केला.
…पण अंतिम निर्णय वरिष्ठांशी चर्चेनंतरच!
रेश्मा काळे जरी आपल्या उमेदवारीवर ठाम असल्या, तरी त्यांनी बंडखोरीचा शेवटचा निर्णय घेण्यापूर्वी चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर आणि समोरासमोर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. “वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच मी माझा पुढील अधिकृत निर्णय काय तो जाहीर करेन,” अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
: रेश्मा काळे यांच्या या भूमिकेनंतर महायुतीचे वरिष्ठ नेते त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात, की जळगावात महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
