साईमत न्यूज नेटवर्क –
कर्नाटकमध्ये एका ३६ वर्षीय कपड्याच्या व्यापाऱ्याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे व्यापाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये थेट राज्य सरकारच्या मोफत बस प्रवास योजनेचा उल्लेख करत तिच्यावर आर्थिक नुकसानीचे खापर फोडल्याचे समोर आले आहे.
मृतांमध्ये प्रभाकर (६५), त्यांची पत्नी ज्योती (५५) आणि मुलगा संतोष (२८) यांचा समावेश आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, प्रभाकर हे कपड्याचे व्यवसाय करत होते. मागील काही वर्षांपासून त्यांना व्यवसायात सातत्याने तोटा सहन करावा लागत होता. त्यात वाढत्या कर्जामुळे आर्थिक ताण अधिकच वाढला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती आणि संतोष यांचे मृतदेह घरात आढळून आले, तर प्रभाकर हे त्यांच्या दुकानात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये गृहकर्जाचे हप्ते, वाढते कर्ज आणि व्यवसायातील तोटा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मोफत बस योजनेमुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाल्याचा आरोपही त्यात करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांना संशय आहे की, प्रभाकर यांनी आधी पत्नी आणि मुलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केली असावी. दोन्ही मृतदेहांवर गळा दाबल्याचे खुणा आढळल्या आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर अधिक स्पष्टता मिळणार आहे.
दरम्यान, संतोष याचे २०२४ मध्ये लग्न झाले होते. घटनेच्या रात्री कुटुंब एकत्र जेवण करून झोपले होते. सकाळी घरातील खोली बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकार उघडकीस आला. मृत्यूच्या आधी कोणतेही भांडण किंवा संशयास्पद घटना घडली नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
