साईमत न्यूज नेटवर्क –
नीट परीक्षा, शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 20 जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे 6 जून रोजी झालेल्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर पुढील आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना दीपके म्हणाले की, सध्या पुण्यातही आंदोलन सुरू असून त्यामध्ये पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणारे अनेक तरुण सहभागी झाले आहेत.
दीपके यांनी सांगितले की, ही चळवळ सुरुवातीला केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित असल्याची टीका करण्यात आली होती. मात्र 6 जूनच्या जंतर-मंतर आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाल्याने ही चळवळ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावेळी त्यांनी पालकांना भावनिक आवाहन करत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांवर बोलण्यापासून रोखू नये असे सांगितले. “तरुणांनी अन्यायाविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.
दीपके यांनी पुढे सांगितले की, एकट्या व्यक्तीचा आवाज दाबला जाऊ शकतो, मात्र लाखो विद्यार्थी एकत्र आले तर तो आवाज दाबणे शक्य नाही. गरज पडल्यास तुरुंगवास भोगण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, 20 जून रोजी होणारे आंदोलन हे यापूर्वीच्या आंदोलनांपेक्षा अधिक मोठे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शैक्षणिक व्यवस्थेतील प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
आता या आंदोलनाकडे विद्यार्थी, पालक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून त्याला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
