‘सर्जिकल स्ट्राईक’ने हादरले अवैध धंदे; सट्टा व दारूचे अड्डे जमीनदोस्त
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी
शहरातील अवैध धंद्यांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत एकाच दिवशी सहा ठिकाणी छापेमारी केली. सट्टा-जुगार आणि गावठी दारूच्या अड्ड्यांवर टाकलेल्या या धाडसत्रात एकूण ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. अत्यंत गोपनीय पद्धतीने नियोजन करून या पथकाने शहर, एमआयडीसी आणि शिरसोली परिसरात एकाचवेळी कारवाया राबवत अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले.
सट्टा अड्ड्यांवर सलग धाड
बॉम्बे रेल्वे गेट परिसरातील पुलाखाली सुरू असलेल्या ‘मिलन डे ओपन’ सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत घनश्याम राजाराम पाटील आणि मुकेश भिका मराठे यांच्यावर कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून रोख रक्कम व साहित्य असा ९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एमआयडीसी परिसरातील पुष्पा पेट्रोलपंपाजवळ सुरू असलेल्या ‘टाईम बाजार’ सट्टा अड्ड्यावरही पोलिसांनी धडक कारवाई केली. हनिफ सैय्यद नवाज आणि रविंद्र गंभीर पाटील यांना ताब्यात घेत ७ हजार ८० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच आर.एल. चौफुली परिसरात सुरू असलेल्या सट्टा-जुगार अड्ड्यावर छापा टाकून मदानंद शिंदे, शुभम जाधव आणि कैलास खेळवण यांच्याकडून ३ हजार ४९० रुपयांची रोकड व साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान, शिरसोली गावात गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या धाडीत आरोपी रवींद्र प्रकाश धनगर याच्याकडून १७ हजार १० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या ठिकाणचा सट्टा अड्डाही पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
गावठी दारूच्या अड्ड्यांवरही हातोडा
सट्टा अड्ड्यांवरील कारवाईसोबतच एमआयडीसी परिसरातील पुष्पा पेट्रोलपंपाजवळ आणि आर.एल. चौफुली परिसरात सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीच्या अड्ड्यांवरही पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत सुरेश भिमराव सपकाळे आणि विशाल पुनमचंद राठोड यांच्याकडून सुमारे ६० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. जप्त दारूची किंमत अंदाजे ६ हजार रुपये आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही ठिकाणांवरील अतिक्रमणे हटवून अवैध अड्डेही जमीनदोस्त करण्यात आले.
विशेष पथकाची उल्लेखनीय कामगिरी
या संपूर्ण मोहिमेत डीवायएसपी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश साळुंखे, आवेश आरिफ शेख आणि अमोल ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका
या विशेष मोहिमेदरम्यान सट्टा-जुगारातून ३७ हजार ५० रुपयांची रोकड आणि ६ हजार रुपयांची गावठी दारू असा एकूण ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध धंद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट इशारा दिला आहे.
जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांविरोधात पुढेही सातत्याने आणि कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
