इंधनात पाणी की भेसळ? मुक्ताईनगरात चौकशीची मागणी तीव्र
साईमत/मुक्ताईनगर / प्रतिनिधी
मुक्ताईनगर येथे भेसळयुक्त पेट्रोल विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. काही वाहनधारकांनी पेट्रोलमध्ये पाण्याचे थर दिसत असल्याचा दावा केल्यानंतर संपूर्ण इंधन पुरवठा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये अचानक बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इंजिन मिसफायर होणे, वाहन अचानक बंद पडणे, मायलेजमध्ये लक्षणीय घट होणे तसेच वारंवार दुरुस्तीचा खर्च वाढणे अशा समस्यांना वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर इंधनाच्या गुणवत्तेबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
दरम्यान, काही वाहनधारकांनी पेट्रोल बाटलीत भरून त्याची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये स्पष्टपणे पाण्याचे थर दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “पूर्ण पैसे देऊनही जर दर्जाहीन इंधन मिळत असेल, तर हा सरळ नागरिकांचा विश्वासघात आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया एका वाहनधारकाने व्यक्त केली आहे.
वाहनांच्या सततच्या बिघाडामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. हजारो रुपयांचा अतिरिक्त दुरुस्ती खर्च सहन करावा लागत असल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे संबंधित पेट्रोल पंपांतील इंधन नमुने तातडीने प्रयोगशाळेत पाठवून सखोल वैज्ञानिक तपासणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुरवठा विभाग, वजन-मापे विभाग तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. इंधनातील कथित भेसळीमुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला असून, प्रशासनाने तत्काळ वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुक्ताईनगरातील नागरिकांचा थेट सवाल आहे की, पेट्रोलमध्ये पाण्याचे थर दिसत असतील तर त्यासाठी जबाबदार कोण? आणि या प्रकरणात कठोर कारवाई नेमकी कधी होणार? या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची प्रतीक्षा आता अधिक तीव्र झाली आहे.
