साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना मंजूर केल्याचा दावा करण्यात आला असून या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष लाभाच्या अटींवरून आता मोठा संभ्रम निर्माण झाला असून केवळ सुमारे 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफीचा फायदा मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये मविआ सरकारकडून कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या नव्या योजनेत पूर्ण लाभ मिळणार नाही. अशा सुमारे 13 लाख शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी मिळणार असून उर्वरित कर्जाची रक्कम त्यांना स्वतः भरावी लागणार आहे.
तर ज्यांचे थकीत कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखांवरील संपूर्ण रक्कम बँकेत जमा केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचेही समोर आले आहे. या अटींमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुणाला किती लाभ मिळणार?
- यापूर्वी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी
- 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना फक्त 50 हजार रुपयांपर्यंत लाभ
- 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना अतिरिक्त रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान
या अटींमुळे कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ अपेक्षेपेक्षा कमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी या अटींवर जोरदार टीका करत सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे.
दरम्यान, सरकार आपल्या अटींवर ठाम राहणार की त्यामध्ये बदल केला जाणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
