साईमत न्यूज नेटवर्क –
राजधानी दिल्लीतील मालवीय नगर येथील आगीची दुर्घटना ताजी असतानाच बिहारमध्ये आणखी एक भीषण घटना घडली आहे. मुझफ्फरपूरमधील ब्रह्मपुरा परिसरातील खासगी प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डात लागलेल्या आगीत अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार या आगीत किमान ४ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र स्थानिक सूत्रे आणि काही वृत्तांनुसार मृतांचा आकडा १० पर्यंत जाऊ शकतो. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून बचावकार्य आणि मदतकार्य सुरू आहे.
घटनेच्या वेळी आयसीयू वॉर्डमध्ये १५ ते २५ रुग्ण दाखल असल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी सुमारे २० रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमींवर इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना पहाटे सुमारे ३:२० वाजता घडल्याची माहिती असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीच्या वेळी आयसीयूमध्ये पुरेशी मदत उपलब्ध नसल्याचा आणि रुग्णांना बाहेर काढण्यासाठी उशीर झाल्याचा आरोप काही नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.
घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली असून पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून तपासासाठी एफएसएल पथकही तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, मृतदेह लपवल्याचा आणि निष्काळजीपणाचा आरोपही काही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. एसएसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या घटनेमुळे बिहारसह देशभरात खळबळ उडाली असून रुग्णालय सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
