साईमत न्यूज नेटवर्क –
राज्यातील अनेक भागांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असताना, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावर मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांच्या घरी प्रथमच नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
धडगाव तालुक्यातील सादरी परिसरातील पाडे डोंगर-दऱ्यांनी वेढलेले असून येथे मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांना दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. उन्हाळ्यात ही समस्या अधिकच तीव्र होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या परिस्थितीची दखल घेत यंग फाउंडेशन आणि डीजेड फाउंडेशन यांनी संयुक्तपणे पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला विहिरीच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर नर्मदा नदीच्या पात्रातून सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपाद्वारे पाणी उचलून ते सादरी पाड्यापर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला.
हा प्रकल्प राबविताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. दुर्गम आणि डोंगराळ परिसरातून तब्बल सात ते आठ किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्यात आली. अनेक ठिकाणी वाहनांची सुविधा नसल्याने साहित्य नदीमार्गे होडीद्वारे वाहून नेण्यात आले. स्वयंसेवक, स्थानिक ग्रामस्थ आणि संस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास गेला.
गावातील नळातून पहिल्यांदाच पाणी येताच नागरिकांच्या आनंदाला उधाण आले. लहान मुले नळाखाली खेळत जल्लोष करताना दिसली, तर ज्येष्ठ नागरिकांनी हा क्षण आयुष्यातील संस्मरणीय आणि ऐतिहासिक असल्याचे सांगितले.
यावेळी डीजेड फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी सांगितले की, आजही अनेक दुर्गम भागांतील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अशा भागांच्या विकासासाठी शासन आणि समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
सादरी पाड्यावर पोहोचलेले नर्मदेचे पाणी हे केवळ पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून, दुर्गम भागातील विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
