साईमत न्यूज नेटवर्क –
राजधानी दिल्लीमधून एक अत्यंत गंभीर आणि मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी देशातील विविध शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपावरून एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या नऊ जणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता. विशेष म्हणजे, त्यांच्या ‘हिटलिस्ट’वर मुंबई शहराचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी मुंबईतील दादर परिसरासह विविध महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच ते पाकिस्तानातील शहजाद भट्टी नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचेही तपासातून निष्पन्न झाले आहे.
अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता अनेक संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबईतील विविध संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ, तसेच दादर रेल्वे स्थानकाचे फुटेज आढळून आले आहे. या व्हिडिओंमध्ये विमानतळ, अणुउर्जा केंद्र, रेल्वे स्थानके आणि वीज निर्मिती केंद्रांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी झाल्याचे दिसून आले आहे.
तसेच आरोपींकडून ग्रेनेडसह काही अत्याधुनिक शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या गंभीर प्रकरणानंतर दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी उच्च सतर्कता (अलर्ट मोड) जाहीर केली असून, सर्व सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
