साईमत न्यूज नेटवर्क –
यंदाच्या मान्सून हंगामावर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली असून, देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीच्या केवळ ९० टक्के पावसाची शक्यता आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, एल निनोच्या तीव्र होत चाललेल्या प्रभावामुळे आता पावसाचा अंदाज कमी करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी राहील. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून सप्टेंबर महिन्यात त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे मान्सूनच्या पावसात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेषतः महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. याचा थेट परिणाम शेती क्षेत्रावर होण्याची भीती असून बळीराजाची चिंता वाढली आहे.
कमी पावसामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वीज निर्मिती आणि आरोग्य व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. याचे परिणाम पुढील वर्षभर जाणवू शकतात, असा इशाराही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचबरोबर जून महिन्यात काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचतो. मात्र यंदा मान्सूनच्या प्रगतीला विलंब होत असल्याने उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेचा तडाखा अधिक वाढू शकतो, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने ९० टक्के पावसाचा अंदाज दिला असला तरी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता तब्बल ६० टक्के असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. त्यामुळे देशासह महाराष्ट्रातही यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा कमकुवत राहण्याची शक्यता व्यक्त होत असून, शेतकरी आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.
