आईला वाचवायला गेलेल्या मुलांवर काठीने बेदम मारहाण
साईमत/रावेर / प्रतिनिधी :
शेतातील रस्त्याच्या वापरावरून झालेल्या किरकोळ वादाने उग्र रूप धारण करत एका वृद्ध शेतकरी महिलेवर तसेच तिच्या दोन मुलांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील आभोडा बुद्रुक शिवारात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित्राबाई लक्ष्मण महाजन (वय ६५, रा. रसलपूर, ता. रावेर) या २७ मे रोजी सकाळी सुमारे १०:३० वाजता आभोडा बुद्रुक शिवारातील शेताच्या रस्त्याने जात असताना रस्ता वापरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून गोपाल सोनजी महाजन, दीपक गोपाल महाजन (दोघेही रा. रसलपूर) आणि जितेंद्र दांडगे (रा. रावेर) यांनी सुमित्राबाई यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद चिघळताच गोपाल महाजन याने सुमित्राबाई यांच्या डाव्या खांद्यावर मारहाण केली. आईला वाचवण्यासाठी आणि आरोपीच्या हातातील काठी पकडण्यासाठी त्यांचा मुलगा विजय पुढे सरसावला असता, तिन्ही आरोपींनी त्याच्यावर अमानुष हल्ला चढवत डोक्यात व पाठीवर काठीने बेदम मारहाण केली.
दरम्यान, दुसरा मुलगा निलेश भावाला वाचवण्यासाठी पुढे आला असता, जितेंद्र दांडगे याने त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले, तर दीपक महाजन याने निलेशला चापटबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यावेळी आरोपींनी तिघांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून, याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत असून आरोपींचा शोध व चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
