तरुणीला पाण्यातून गुंगीचे औषध १० जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल
साईमत/रावेर / प्रतिनिधी :
तालुक्यातील एका गावातील तरुणीला गुंगीचे औषध देऊन अपहरण करण्यात आल्याची, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे नेऊन तिच्याशी जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याची आणि तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीसह १० जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका शिक्षकाला अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पीडित तरुणी ही नेहमीप्रमाणे शिक्षणासाठी रावेर येथे जात असताना संशयित आरोपी आदित्य राजू महाजन याने तिला रस्त्यात अडवले. “तुझ्याशी काही महत्त्वाचे काम आहे,” असे सांगत आरोपीने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. त्यानंतर पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देण्यात आल्याने तरुणीची प्रकृती बिघडली. ती अर्धबेशुद्ध अवस्थेत असताना तिला थेट आळंदी येथे नेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
फिर्यादीनुसार, पीडित तरुणी पूर्ण शुद्धीवर नसतानाच आरोपी आदित्य महाजन याने तिच्याशी जबरदस्तीने विवाह केला. या विवाहासाठी आरोपीच्या काही मित्रांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्याचेही समोर आले आहे. विवाहानंतर आरोपीने तरुणीला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडितेने विरोध दर्शविल्यानंतर आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या धमक्या, मानसिक त्रास आणि दबावामुळे घाबरलेल्या तरुणीने अखेर रावेर पोलीस ठाणे गाठत संपूर्ण प्रकार उघड केला.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. प्राथमिक तपासादरम्यान मध्य प्रदेशातील एका शिक्षकाला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यात आणखी आठ आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे रावेर तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.
