२३० प्रवासी सुखरूप; सुरक्षेच्या कारणास्तव परतवले विमान
दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोठी घटना टळली आहे. उड्डाणानंतर तब्बल आठ तास हे विमान आकाशात घिरट्या घालत राहिले आणि अखेरीस सुरक्षेच्या कारणास्तव ते पुन्हा दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
या विमानात एकूण २३० प्रवासी आणि क्रू सदस्य होते. अचानक उद्भवलेल्या तांत्रिक समस्येमुळे विमानाच्या पुढील प्रवासाबाबत धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पायलटने तातडीने निर्णय घेत विमान माघारी वळवले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिल्ली–सॅन फ्रान्सिस्को विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच ते अर्ध्या मार्गातून परत आणण्यात आले. विमान दिल्लीत सुरक्षितपणे उतरवण्यात आले असून, बिघाडाचे कारण तपासले जाणार आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो,” असे त्यांनी सांगितले.
कंपनीकडून पुढे सांगण्यात आले की, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून त्यांना सॅन फ्रान्सिस्कोला जाण्यासाठी दुसरे उड्डाण, हॉटेल मुक्काम आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही एअर इंडियाने स्पष्ट केले.
दरम्यान, अशा प्रकारची ही पहिली घटना नसल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी मार्च महिन्यात दिल्ली–व्हँकुव्हर विमानालाही तांत्रिक अडचणीमुळे सुमारे आठ तास हवेत घिरट्या घालून पुन्हा दिल्लीत परतावे लागले होते.
या घटनांमुळे विमानसेवेतील तांत्रिक सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मागील वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतरही एअर इंडियाच्या सुरक्षिततेवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्या दुर्घटनेत २७० जणांचा मृत्यू झाला होता, तर एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला होता.
सध्या या ताज्या घटनेनंतर संबंधित विमानाच्या तांत्रिक तपासणीला सुरुवात करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
