महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी प्रतापराव पाटील यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी
साईमत/जळगाव/पाळधी/ प्रतिनिधी :
धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्टेशनवर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आता स्थानिक स्तरावरून जोरदार मागणी पुढे येऊ लागली आहे. जिल्हा परिषद व स्थायी समितीचे माजी सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी भुसावळ विभागाच्या रेल्वे प्रशासनाला निवेदन देत पाळधी रेल्वे स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा देण्याची मागणी केली आहे.
पाळधी हे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे रेल्वे केंद्र मानले जाते. परिसरातील अनेक गावांतील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी तसेच नोकरदार वर्ग रेल्वे सेवेवर अवलंबून असून, अनेक प्रवाशांना दररोज जळगाव किंवा भुसावळ येथे जाऊन रेल्वे पकडावी लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय होत असून आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याची बाब प्रतापराव पाटील यांनी निवेदनातून अधोरेखित केली आहे.
विशेषतः उच्च शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायाच्या निमित्ताने वारंवार प्रवास करावा लागतो, तर शेतकऱ्यांनाही कृषी संबंधित कामांसाठी शहरांकडे जावे लागते. उपचारासाठी बाहेरगावी जाणाऱ्या रुग्णांनाही रेल्वे थांब्याअभावी गैरसोय सहन करावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाळधी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता काही महत्त्वाच्या गाड्यांना येथे थांबा देणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतापराव पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी गाडी क्रमांक १२१११ सूरत-अमरावती एक्सप्रेस, गाडी क्रमांक १९००७ सूरत-भुसावळ एक्सप्रेस तसेच खान्देश एक्सप्रेस (१९००३) वांद्रा टर्मिनस-भुसावळ या गाड्यांना पाळधी रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याची मागणी केली आहे.
या गाड्यांना थांबा मिळाल्यास परिसरातील हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून विद्यार्थ्यांसह व्यापारी, शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रेल्वे स्थानकाचा विकास होऊन स्थानिक आर्थिक आणि व्यापारी व्यवहारांनाही गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
लोकहिताचा विचार करून रेल्वे प्रशासनाने पाळधी रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांच्या मागणीची दखल घ्यावी आणि संबंधित गाड्यांना तातडीने अधिकृत थांबा मंजूर करावा, अशी अपेक्षा आता स्थानिक नागरिकांकडूनही व्यक्त केली जात आहे.
