साईमत न्यूज नेटवर्क –
सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट सुमारे १८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांपैकी पाच तरुण कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील असून दोन जण मर्ढे गावातील तर एक जण खटाव तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक बचाव पथके आणि सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
ही दुर्घटना रात्री साधारणपणे २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घाटातील तीव्र वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि वाहन थेट खोल दरीत कोसळले. कार दरीत पडत असताना आत अडकलेल्या तरुणांनी मदतीसाठी आर्त हाकाही मारल्या, मात्र दरीची खोली आणि अंधारामुळे तातडीने मदत पोहोचू शकली नाही.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने युद्धपातळीवर बचाव मोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर दरीतून आठही मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
या दुर्घटनेत महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (२५) आणि संदीप काटकर (३५) यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. घाटरस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण कठडे नसल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.
