साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक : शहर व परिसरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या असून सुमारे ७ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात एक विधिसंघर्षित बालक आणि शोएब अन्सारी उर्फ पाप्या चोरवाला याला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव परिसरातील दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा समांतर तपास करत होती. दरम्यान, मोसम पूल परिसरातील बसस्टॉपजवळ एक संशयित विनानंबर दुचाकीसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र सखोल चौकशीत त्याने आणि त्याचा साथीदार शहजाद अहमद शकील अहमद उर्फ शहजाद गुजी यांनी टेहरे (ता. मालेगाव) येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
तपासात पुढे समोर आले की, या टोळीने मालेगाव शहर व ग्रामीण भागातून एकूण ११ दुचाकी चोरी केल्या होत्या. या दुचाकी शोएब अन्सारी उर्फ पाप्या चोरवाला याच्याकडे विक्रीसाठी दिल्या जात होत्या.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सर्व ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त वाहनांमध्ये हिरो एचएफ डिलक्स, होंडा युनिकॉर्न, होंडा शाइन, होंडा अॅक्टिव्हा, यामाहा एफझेड आणि हिरो सीडी डॉन यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे मालेगाव छावणी आणि पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी शोएब अन्सारी हा चोरीच्या गाड्या कमी दरात विक्री करत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी शहजाद गुजीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
