रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील घटना; अपघातात प्रवासी जखमी, स्थानिकांकडून तत्काळ मदतकार्य
साईमत न्यूज नेटवर्क –
रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांच्या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात एसटी बस आणि एर्टिका कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जण जखमी झाले आहेत, तर दापोली तालुक्यातील देवाचा खळगा परिसरात झालेल्या दुसऱ्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ हा अपघात घडला. भडकंबा येथील प्रल्हाद भिकाजी शिंदे हे एसटी बस खडीकोळवण ते साखरपा या मार्गावर घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या कारची बसला जोरदार धडक बसली. या अपघातात बसचालक प्रल्हाद शिंदे यांच्यासह बसमधील प्रवासी आणि कारमधील प्रवासी असे मिळून पाच जण जखमी झाले. सर्व जखमींना स्थानिकांच्या मदतीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
दरम्यान, दापोली–साखळोली मार्गावरील देवाचा खळगा परिसरात झालेल्या दुसऱ्या अपघातात इको वाहन आणि दुचाकी यांच्यात भीषण धडक झाली. फणसू येथील शुभम फडकले आणि त्याचा मित्र अमन खांबे हे दुचाकीवरून प्रवास करत असताना हा अपघात घडला. यात शुभम फडकले गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येत असताना उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या दोन्ही घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. विशेषतः देवाचा खळगा परिसरातील धोकादायक वळणावर वारंवार अपघात होत असल्याने येथे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
