साईमत न्यूज नेटवर्क –
छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाने सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या अनोख्या उपक्रमाची सध्या देशभरात सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या ७२ तासांत या तथाकथित डिजिटल राजकीय चळवळीशी एक लाखांहून अधिक युवक जोडले गेल्याचा दावा करण्यात येत असून, इन्स्टाग्रामवर तब्बल २० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाल्याने या मोहिमेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या उपक्रमामागे ३० वर्षीय अभिजीत दीपके हा युवक असून, बेरोजगार आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तरुणांचा आवाज बनण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जात आहे.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दीपके हा व्यावसायिक पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट आहे. पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन विषयात एमएस पदवी संपादन केली. राजकीय संवाद आणि सोशल मीडिया मोहिमा राबविण्याचा त्याला अनुभव असून, २०२० ते २०२२ या कालावधीत त्याने आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान चर्चेत आलेल्या अनेक राजकीय मीम्सच्या संकल्पनेतही त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. याशिवाय दिल्ली शिक्षण विभागात कम्युनिकेशन सल्लागार म्हणूनही त्याने काम केले आहे.
‘कॉकरोच जनता पार्टी’ची कल्पना सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीनंतर चर्चेत आली. खोट्या पदव्यांशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली होती. बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षा आणि रोजगाराच्या प्रश्नांमुळे आधीच नाराज असलेल्या तरुणांनी या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. त्याच पार्श्वभूमीवर अभिजीत दीपकेने १६ मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर “सगळे कॉकरोच एकत्र आले तर?” अशी उपरोधिक पोस्ट केली. त्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने वेबसाईट आणि गुगल फॉर्म सुरू करण्यात आला.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ठेवण्यात आलेल्या अटींनी तरुणांचे विशेष लक्ष वेधले. “बेरोजगार, आळशी, सतत ऑनलाईन राहणारे आणि व्यावसायिक पद्धतीने तक्रारी करणारे” लोकच पक्षात सहभागी होऊ शकतात, अशी विनोदी अट जाहीर करण्यात आली होती. सोशल मीडियावर ही शैली विशेषतः ‘जेन-झी’ पिढीला भावली आणि मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू लागला.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि किर्ती आझाद यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांनीही या मोहिमेची दखल घेत समर्थन दर्शविले. सुरुवातीला विनोदी स्वरूपात सुरू झालेली ही मोहीम आता बेरोजगारी, नीट पेपर लीक, स्पर्धा परीक्षांतील अनिश्चितता आणि युवकांवरील मानसिक तणाव या गंभीर मुद्द्यांशी जोडली जात असल्याने राजकीय वर्तुळातही तिची चर्चा रंगू लागली आहे.
