साईमत न्यूज नेटवर्क –
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडून मोठी दुर्घटना झाली आहे. पालघर जिल्ह्यातील धाणीवरी परिसरात वऱ्हाडी ट्रकला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मुंबई–अहमदाबाद महामार्गवरील हा अपघात धाणीवरी परिसरात घडला. वऱ्हाडी ट्रकमध्ये १०० हून अधिक जण प्रवास करत होते. लग्नासाठी निघालेल्या या वऱ्हाडाच्या वाहनाला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. काही प्रवासी वाहनाखाली अडकले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालय तसेच धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वऱ्हाडी ट्रक बापूगाव येथून साखरपुड्यासाठी निघाला होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनरने ट्रकला धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून दुर्घटनेचे नेमके कारण शोधले जात आहे.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून लग्नघरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
