साईमत न्यूज नेटवर्क –
उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्हा येथे विवाहित महिलेची अत्यंत निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हात-पाय बांधून आणि तोंडात कापडाचा बोळा कोंबून महिलेची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोरारा गाव येथील रहिवासी जावत्री हिचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घरातील खाटेजवळ ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. तिचे हात-पाय बांधलेले होते तसेच तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. शरीरावर मारहाणीच्या जखमांचेही अनेक निशाण आढळून आले.
ही घटना सोमवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शेजारी राहणारी एक महिला जावत्रीच्या घरी दूध देण्यासाठी गेली होती. तिने वारंवार आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा उघडत नसल्याने तिला संशय आला. त्यानंतर तिने परिसरातील नागरिकांना बोलावले. काही जण घराच्या छतावर चढून आत डोकावले असता जावत्री जमिनीवर पडलेली दिसली. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडत घरात प्रवेश केला. घरातील परिस्थिती पाहून पोलिसांनाही धक्का बसला. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की जवळच्या व्यक्तीनेच कट रचून हे कृत्य केले, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत विविध पुरावे गोळा केले आहेत.
स्थानिकांच्या माहितीनुसार, जावत्री घरात एकटीच राहत होती. तिला मूल नसल्याने तिने काही वर्षांपूर्वी आपल्या भावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. मात्र कौटुंबिक वादामुळे ती मुलगी परत देण्यात आली. त्यानंतर तिने नातेवाईकांच्या मुलाला दत्तक घेतल्याचे सांगितले जाते. गावकऱ्यांच्या मते, तिच्या घरात नेहमीच कौटुंबिक वाद होत असत.
जावत्रीचे दोन विवाह झाले होते. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे दुसरे लग्न बुलंदशहर जिल्ह्यातील कन्हैयासोबत झाले होते. मात्र ते नातेही टिकले नाही. अखेरीस तिच्या आई-वडिलांनी पोरारा गावात स्वतंत्र घर बांधून दिले होते आणि ती तेथे एकटी राहत होती. या हत्याकांडामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
