साईमत न्यूज नेटवर्क –
हमीरपूर – उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ३४ वर शनिवारी भीषण अपघात घडला असून यात पती-पत्नीसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौदाहा कोतवाली परिसरातील चिरका आणि मावैया गावांदरम्यान हा अपघात घडला. मारुती वॅगनआर कारमधून एकाच कुटुंबातील दोन जोडपी आणि एकूण पाच जण प्रवास करत होते. हे सर्वजण बागेश्वर धाम येथील तीर्थयात्रा आटोपून कानपूरकडे परतत होते.
राष्ट्रीय महामार्ग ३४ वर झालेल्या या भीषण अपघातानंतर कारमधील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चालकाला झोप लागल्यामुळे किंवा ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
मृत व्यक्ती हे कानपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे, तर कार चालक लखनौ जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
