साईमत न्यूज नेटवर्क –
नागपूर – नागपूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई करत नागरिकांची फसवणूक करून लंपास करण्यात आलेली तब्बल ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपयांची रक्कम तसेच २३२ मोबाईल हँडसेट मूळ मालकांना परत केले आहेत. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात ही रक्कम आणि मोबाईल संबंधित नागरिकांना सुपूर्त करण्यात आले.
या निमित्ताने सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कायदा तंत्रज्ञान व धोरण केंद्र, एमएनएलयु नागपूरच्या प्रा. डॉ. दिशा खैरे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक पीयुष तेलरांधे तसेच सायबर व डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ हिमांशू जोशी यांनी सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ पासून नागपूर शहरात सायबर फसवणुकीच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या होत्या. यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या पद्धती वापरण्यात आल्या. पहिल्या प्रकारात, सायबर गुन्हेगारांनी स्वतःला सीबीआय किंवा ईडीचे अधिकारी भासवून “डिजिटल अरेस्ट वॉरंट” दाखवत नागरिकांना भीती घालून आरबीआयकडे पैसे जमा करण्यास भाग पाडले.
दुसऱ्या प्रकारात, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. बनावट ॲप्स डाउनलोड करून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
नागपूर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींच्या बँक खात्यांतील एकूण रक्कम ‘लीन’ आणि ‘फ्रीज’ करून गोठवली. न्यायालयाच्या आदेशानंतर ही रक्कम पीडितांना परत करण्यात आली.
यासोबतच, पोलिसांनी विविध शहरांमधून कारवाई करत २३२ महागडे मोबाईल जप्त केले होते. अंदाजे ४३ लाखांहून अधिक किमतीचे हे मोबाईल आजच्या कार्यक्रमात त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांना मोठा दणका बसल्याचे पोलिसांनी सांगितले.
