साईमत न्यूज नेटवर्क –
बीड : बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात एका संतप्त जोडप्याने अंगावर पेट्रोल-डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील हे दाम्पत्य गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलीच्या शोधासाठी वारंवार पोलीस कार्यालयाचे खेटे मारत होते. संबंधित मुलीचे एका तरुणाने अपहरण केल्याची तक्रार असूनही अद्याप तिचा शोध लागलेला नाही, असा त्यांचा आरोप आहे.
वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच मुलगी अद्याप सापडत नसल्याने पालक हतबल झाले होते. या नैराश्यातूनच त्यांनी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असून बेपत्ता मुलीचा शोध आणि तपास प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
