साईमत न्यूज नेटवर्क –
राज्यात दूध, सीएनजी आणि त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढत असतानाच, आता त्याचा थेट परिणाम एसटी महामंडळावरही दिसून येत आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर सुमारे १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बस तिकीट दरात वाढ होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे याबाबतचे संकेत अधिक ठळक झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण ऑनलाइन बैठका घेत असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, काही निर्णय हे कठोर असले तरी ते घ्यावेच लागतील. “महागाई अशीच वाढत राहिली, तर महामंडळ टिकवण्यासाठी आणि चालवण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावे लागतील,” असे ते म्हणाले.
एसटी महामंडळावर जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची जबाबदारी असून, दररोज १४ हजारांहून अधिक बस रस्त्यावर धावत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढत्या खर्चामुळे महामंडळाच्या आर्थिक शिस्तीवर मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे.
सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या उत्पन्न आणि शासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबतही सविस्तर माहिती दिली. महिला प्रवाशांना दिली जाणारी सवलत, दिव्यांग व इतर घटकांना मोफत प्रवास तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सुविधा यांचा खर्च राज्य शासनाकडून भरला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नवीन बस खरेदी, बसस्थानकांचे बांधकाम व दुरुस्ती यासाठीही शासनाकडून निधी मिळतो, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि भविष्यातील खर्च कमी करण्यासाठी २०३५ पर्यंत संपूर्ण बस ताफा इलेक्ट्रिक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सध्या नव्याने ८ हजार डिझेल बस घेण्यात आल्या असल्या तरी भविष्यात इलेक्ट्रिक बसवरच भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चार्जिंग सुविधेसाठी राज्यभरात एसटीच्या २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी आणि महापालिकांच्या पुलांखालील रिकाम्या जागांचा उपयोग ईव्ही चार्जिंग स्टेशनसाठी करण्याचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे समोर आले आहे.
एकूणच वाढत्या इंधनदरामुळे एसटी महामंडळावर आर्थिक दबाव वाढत असून, तिकीट दरवाढीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
