साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक जिल्ह्यातील श्रीपुरवडे गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली असून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची दुहेरी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
श्रीपुरवडे–जायखेडा रस्त्यालगत शेतात वास्तव्यास असलेले मुरलीधर राघो ठाकरे (वय ६५) आणि त्यांची पत्नी यशोदाबाई मुरलीधर ठाकरे (वय ५८) हे दोघे घरी एकटेच होते. त्यांचा मुलगा समाधान ठाकरे आणि सून हे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते.
प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून रागाच्या भरात मुरलीधर ठाकरे यांनी कोयत्याने पत्नी यशोदाबाई यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात यशोदाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर आरोपी पती मुरलीधर ठाकरे यांनी विषारी औषध प्राशन करून गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री सुमारे आठच्या सुमारास उघडकीस आली.
लग्नसमारंभ आटोपून मुलगा आणि सून घरी परतल्यानंतर घरात अंधार दिसल्याने त्यांनी स्विच सुरू केला. त्यावेळी घरात यशोदाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. हा थरारक प्रकार पाहून त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले.
त्यानंतर नागरिकांनी तात्काळ ‘112’ क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे आणि विभागीय पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांनी घटनास्थळी पाहणी केली.
दोन्ही मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश हिरे आणि डॉ. स्वराज देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून अंत्यसंस्कार अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडले. मृत दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
