साईमत न्यूज नेटवर्क –
पाटणा येथे एका नववधूच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली असून, लग्नानंतर अवघ्या चार दिवसांतच तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरकडील कुटुंबाने केला आहे. या प्रकरणात पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सासूला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय संजू कुमारी हिचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होते. तिलक, हळद आणि विवाह सोहळा पार पडून घरात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबाने आपल्या क्षमतेपेक्षा अधिक खर्च करत रोख रक्कम, दुचाकी आणि घरगुती वस्तूंसह मोठी भेटवस्तू दिल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र लग्नानंतरच सोन्याच्या साखळीच्या मागणीवरून वाद सुरू झाल्याचा आरोप आहे. माहेरकडील कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, वर पक्षाने लग्नात सोन्याची साखळी न दिल्याने नाराजी व्यक्त केली आणि त्यावरून नववधूला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. वारंवार मारहाण व छळ केला जात असल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मृत नववधूने फोनवरून आपल्यावर होणाऱ्या छळाची माहिती भावाला दिल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर काही दिवसांतच तिच्या मृत्यूची बातमी आली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, तिचा गळा दाबून खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणात पती विनोद आणि इतर सासरच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. पोलिसांनी तपासादरम्यान सासू सुमित्रा देवीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मृत्यू आत्महत्या की हत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
