२.७२ कोटींचा सुका गांजा पोलिसांकडून नष्ट
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून जळगाव पोलिसांनी मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई करत तब्बल १३६२ किलो सुका गांजा नष्ट केला आहे. एनडीपीएस कायद्यान्वये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २३ गुन्ह्यांतील हा मुद्देमाल असून त्याची अंदाजे किंमत २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.
ही कारवाई जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत अत्यंत काटेकोर आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडली.
या संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या जप्त अंमली पदार्थांचा सविस्तर आढावा घेतला.
सर्व २३ गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्या नाशासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीने सखोल पडताळणी करून मंजुरी दिल्यानंतर रविवारी ही नाश प्रक्रिया दोन सत्रांमध्ये राबविण्यात आली.
जिल्हापेठ पोलीस स्टेशन परिसरात विशेष खड्डा खोदून पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेत गांजाचा नाश करण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करून पारदर्शकता सुनिश्चित करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.
या कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (अध्यक्ष), अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे तसेच निरीक्षक वजन-मापे राजेंद्र व्यवहारे यांचा समावेश होता.
स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही मोठी कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असून जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईचा पोलिसांनी ठोस संदेश दिला आहे.
