साईमत / उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात शनिवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. टिकैतराय तलाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर भाजप युवा मोर्चाचे नेते महाराज चेतन तिवारी उर्फ श्याम चेतन यांच्यावर अज्ञात समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला चढवला. आरोपींनी त्यांच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या असून त्यातील एक गोळी कमरेत लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
गोळीबारानंतर रक्तबंबाळ अवस्थेत श्याम चेतन रस्त्यावर कोसळले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी अवस्थेतील श्याम चेतन यांना त्वरित केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
प्राथमिक तपासात जुन्या वैमनस्यातून तसेच पोस्टर लावण्याच्या कारणावरून हा वाद उफाळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बाजारखाला पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तसेच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
श्याम चेतन तिवारी हे मेहंदीगंज परिसरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोर बांधकामाचे काम सुरू होते. शनिवारी रात्री ते गवंडीकडून विटा बसवून घेत असताना शेजारी राहणारा वैभव बाजपेयी आपल्या एका मित्रासह तेथे आला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी अचानक गोळीबार केला. गोळी लागल्यानंतर श्याम चेतन जमिनीवर कोसळले. आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
