मेहरूण परिसरातून एलसीबीची शिताफीची कारवाई; पुणे पोलिसांच्या तपासाला वेग
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
पुणे शहरातील रायकर मळा परिसरात सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने शिताफीने अटक केली. मेहरूण परिसरातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या तपासाला मोठी गती मिळाली असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रायकर मळा येथे २ मे २०२६ रोजी घरगुती वादातून भानुदास भास्कर चौधरी यांनी आपल्या सून स्वाती तेजस चौधरी (वय २८) यांच्यावर डोक्यात वार करून त्यांचा खून केला होता. घटनेनंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून तेथून पलायन केले. घरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी फरार झाल्यानंतर पुणे पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यान, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ लपून बसला आहे. माहितीची खात्री करून एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचला. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत भानुदास भास्कर चौधरी याला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह अंमलदार सफौ अतुल वंजारी, पोहेकों विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, राहुल रगडे, रविंद्र कापडणे आणि प्रदीप चौरे यांनी सहभाग घेतला. जळगाव एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईचे पोलिस दलात कौतुक होत आहे.
