फुले मार्केट, दाणा बाजार व कोंबडी बाजारात अतिक्रमणाविरुद्ध महापालिकेची कारवाई
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
जळगाव शहरातील फुले मार्केट, दाणा बाजार आणि कोंबडी बाजार परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सकाळपासून मोठी कारवाई करत अनधिकृत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली. सकाळी 8 वाजता सुरू झालेली ही कारवाई दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होती.
फुले मार्केट परिसरात पथकाने अचानक तपासणी सुरू केल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी तसेच कार्यालयीन वापरासाठी मीटर रूममध्ये अनधिकृतपणे ठेवलेले टेबल, बाकडे आणि इतर साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य तात्काळ जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर दाणा बाजार आणि कोंबडी बाजारातही अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. रस्त्यांवर तसेच सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे ठेवलेल्या हातगाड्या, साहित्य आणि इतर अडथळे हटविण्यात आले. या दरम्यान तीन हातगाड्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांवर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही संपूर्ण मोहीम अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच सार्वजनिक जागांचा योग्य वापर व्हावा यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कारवाईनंतर बाजार परिसरात व्यापाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि अस्वस्थता दिसून आली. मात्र, शहरात अतिक्रमणाविरोधात पुढेही कठोर मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला असून, नागरिक व व्यापाऱ्यांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमण टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
