साईमत / नागपूर
देशातील प्रमुख शहरांमध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक चित्र समोर आले आहे. ‘एनसीआरबी’च्या (National Crime Records Bureau) २०२४ सालच्या अहवालानुसार नागपूरमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांचा दर मुंबई आणि पुण्यापेक्षा अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये नागपूरमध्ये महिलांविरोधातील एकूण १,५१३ गुन्हे नोंदवले गेले. त्याचवेळी मुंबईत ६,३५८ आणि पुण्यात २,६३१ गुन्ह्यांची नोंद झाली असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत गुन्हे दर नागपूरमध्ये सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूरमध्ये महिलांविरोधातील गुन्हे दर प्रति एक लाख लोकसंख्येमागे १२३.८ इतका आहे. तुलनेत मुंबईत हा दर ७४.६ आणि पुण्यात ११०.१ इतका आहे. या आकडेवारीनुसार नागपूरचा देशातील प्रमुख शहरांमध्ये सातवा क्रमांक लागतो.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या बाबतीतही नागपूरमध्ये २७३ गुन्हे नोंदवले गेले असून गुन्हे दर २२.३ इतका आहे. या श्रेणीत देशात इंदूर आणि पुण्यानंतर नागपूरचा क्रमांक लागतो.
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये २०२४ साली नागपूरमध्ये १३६ प्रकरणे नोंदली गेली असून गुन्हे दर ११.१ इतका आहे. हा दर मुंबई (४.८) आणि पुणे (१०.१) पेक्षा अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
विनयभंगाच्या घटनांमध्येही नागपूर देशात चौथ्या क्रमांकावर असून १४६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच लैंगिक छळवणुकीच्या घटनांमध्ये नागपूरचा देशात तिसरा क्रमांक लागतो.
शहरात महिलांचा पाठलाग करण्याच्या घटनांमध्येही १०१ गुन्ह्यांची नोंद झाली असून या श्रेणीत नागपूरचा देशात उच्च स्थानावर समावेश आहे.
या सर्व आकडेवारीमुळे नागपूरमधील महिला सुरक्षा गंभीर प्रश्नाच्या भोवऱ्यात अडकली असून प्रशासनाच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
